मनभावन श्रावण
मनभावन श्रावण


झडझड आषाढाची, आता सरली गं सये
रिमझिम सरी आल्या, आला श्रावण गं सये (1)
घननीळ बरसतो, नद्या, धबधबे वाहती
प्रपातांचे शुभ्र पाणी, तुषार ये अंगावरी (2)
वसुंधरा सजली गे, हिरवी वस्त्रे लेवूनिया
साज फळांचा फुलांचा, स्वागताला घालूनिया (3)
मंद वाऱ्याची झुळूक, कुंदवात दरवळे
चैतन्य हे पानोपानी, सख्या झडकरी तू ये (4)
घरी सणांची धांदल, माझ्या मनी उलघाल
कधी येईल साजण, मन होई उतावीळ (5)
<
p>
वरुणाच्या सरी आता, रिमझिम बरसती
वसुंधरेच्या स्वागता, आतुरला गं तो चित्ती (6)
रश्मी किरणांमधुनी, ऊन हळदुले झरे
अंबरात सप्तरंगी, इंद्रधनू गोफ सजे (7)
रिमझिम सरी येती, क्षणभरे थबकती
अभ्रांतूनी रविराज, हळूहळू डोकावती (8)
रिमझिम सरींसवे, आला आला गं साजण
भेट एकांती फुलेल, आता आतुर मन्मन (9)
रिमझिम धारांमधे, तन मन सुखावेल
ऊन पावसाचा खेळ, मधुमीलन उमलेल (10)