मजा गुलाबी थंडीची
मजा गुलाबी थंडीची
ऋतू हिवाळा आलाय
थंडी गुलाबी घेऊन,
धुके पसरले आज
पहा बाहेर जाऊन...!१!
अस्पष्टश्या धुक्यातून
दवबिंदू चमकते,
ओलाव्याच्या चादरीत
धरणीही गारठते...!२!
गार वाऱ्यात झोंबते
पशुपक्षी जीवसृष्टी,
ऋतू थंडीचा भोगूया
ठेवू जरा दूर दृष्टी...!३!
कोवळ्या उन्हातून
परिसर उब घेते,
थंड झुळूक वाऱ्याने
अंग अंग शहारते...!४!
सायंकाळी आकाशात
रम्य नयन नजारा,
शोभे गुलाबी रंगाने
धुंद निसर्ग पसारा...!५!
चला पेटवू शेकोटी
ऊब घेण्यास गर्मीची,
रात बहरे थंडीने
मजा लुटू या सर्दीची...!६!
