STORYMIRROR

Chandan Pawar

Tragedy

4  

Chandan Pawar

Tragedy

महिला आरक्षण

महिला आरक्षण

1 min
596

महिलांच्या वाढीव आरक्षणाची

अखेर गुळणी फुटली आहे

सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्राच्या

आरक्षणाने 'पन्नाशी' गाठली आहे


महिला सबलीकरणाचा गवगवा

जगजाहिरपणे करता येतो

महिला आरक्षणाच्या ढालीने

नवीन तीर मारता येतो


जे इतर निवडणुकांत झाले

तसेच आताही झाले

बायकोच्या नावावर

नवरेच निवडून आले


महिलांच्या आरक्षणाला 

पुरुषांचा लळा आहे

बायकोच्या सत्काराला

नवऱ्याचा गळा आहे


बायको नावालाच पदावर

कामकाज नवरा बघणार आहे

महिला आरक्षण शेवटी

पुरुषच मिरवणार आहे


महिला आरक्षणाचे धोरण

पुरुषांच्या पथ्यावर पडले आहे

पडद्यामागचे राजकारण

त्यातूनच वाढले आहे


देणाऱ्याने दिले तरी 

घेणाऱ्यांची झोळी फाटकी नको.

'महिला सबलीकरण' कागदी

अन नाटकी नको


महिलामुक्तीच्या धोरणांची

घराघरात भक्ती केली जाते

मुलींची गर्भहत्या करून

कायमची मुक्ती दिली जाते


महिलामुक्ती आरक्षणाचा असा

हा फसवा पुरुषी नारा आहे

मुक्तात्मे म्हणत असतील इथे 

जन्म न घेतलेलाच बरा आहे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy