महात्मा ज्योतिबा
महात्मा ज्योतिबा
धन्य धन्य ते महात्मा जोतिबा फुले,
तुमच्यामुळेच आमचे जीवन हर्षले।।
स्वतःच्या घरदारावर फिरवूनी नांगर,
बहुजनांना दिलीत मायेची साखर,
शिक्षणाचे महत्त्व बहुजनांना पटवले,
तुमच्यामुळेच आमचे जीवन हर्षले।।
स्त्री शिक्षणाचा पाया तुम्ही रचलात,
स्त्री-जीवनाला एक ओळख दिलात,
न फिटणारे उपकार तुम्ही आम्हांवरी केले,
तुमच्यामुळेच आमचे जीवन हर्षले।।
छत्रपती शिवरायांना आपले आदर्श मानूनी,
शेतकरी-कुणबी राजाला दिला मान मिळवूनी,
आसूड उगारूनी सनातन्यांना धक्के तुम्ही दिले,
तुमच्यामुळेच आमचे जीवन हर्षले।।
हे थोर क्रांतिकारका नमन तुम्हां,
सदैव व्हावे स्मरण तुमचे आम्हां,
तुम्हीच फुलविले आमच्या जीवनात आनंदी मळे,
तुमच्यामुळेच आमचे जीवन हर्षले।।
