महात्मा ज्योतिबा फुले
महात्मा ज्योतिबा फुले


हजारो वर्षांपासून होते हीनत्वच बहाल
वर्णजातीच्या नावाखाली शुद्रातिशुद्रांना
हक्कांसाठी त्यांच्या उगवला क्रांतिसूर्य
मिटविण्या तमसरुपी या प्रथा परंपरांना
ठेवूनिया दृष्टिकोन मानवता हाच मनात
घातला पाया नव्या युगाचा हा बुद्धिनिष्ठ
केला कठोरपणे वज्र प्रहार धर्मसंस्थेवरी
मानला ईश्वर हा निसर्गमय 'निर्मिक' श्रेष्ठ
शिकवून सावित्रीबाईस घडविला इतिहास
स्त्री उत्थान कार्य शैक्षणिक क्रांतीने केले
वंचित होती जी स्त्री अनादि काळापासून
निराश जीवनात चैतन्य नंदनवन फुलविले
शेतकरी
,दलित व अस्पृश्यांचा मुक्तीदाता
मांडला परिवर्तनाचा सर्वस्पर्शी सुविचार
प्रथा मोडली सतीची अन् विधवांचा छळ
सोडविले गुलामगिरीतून केले थोर उपकार
सत्यापुरता नसतोच धर्म, सत्य हेचि परब्रह्म
पटवून दिले सत्यशोधक समाजाने जगाला
जपली बांधिलकी सदैव उपेक्षितवर्गाबरोबर
लेखणीतून घडविले ह्या समाजक्रांती युगाला
झटले आजीवन केंद्र मानवतावाद हा मानून
माणूसपण हे माणसांचे दिले परत मिळवूनी
निर्धार दृढ केला होता रणशिंग फुंकण्याचा
क्रांतिसूर्य सदैवच विचाराने राहिला तळपुनी