मेघराजा रे..!
मेघराजा रे..!
अवचित असा येतोस अन् ,
सारा गोंधळ घालून जातोस..!
क्षणात बरसून इथे मजला,
तू चिंब चिंब करून जातोस..!
भर दिवसा तू झाकून पडदा,
अंधार करून टाकतोस..!
दिवस सरण्याआधी नभीचा,
दीप मालवून टाकतोस..!
येताना भेटायला तू सोबत,
तो खट्याळ वारा आणतोस..!
त्याच्या मदतीने तू सारी,
माझी धूळ वस्त्रे उडवतोस..!
करुनी वर्षा अंगणी तू माझ्या,
जरी तृप्त करून जातोस..!
पण गरज नसतांनाही कधी कधी,
उगाच छळून जातोस..!
आणि हल्ली येतोस असा की,
तू ऋतू काळ ना बघतोस..!
इच्छा मनी नसतांनाही,
तू उगाच भिजण्या भाग पाडतोस..!
येतोस असा की जसा,
अंगावर काळ आला भासवतोस..!
भीती घालून लेकरां माझ्या,
त्यांच्या उरी धडकी भरवतोस..!
कधी झिरमिर कधी रिमझिम,
कधी सारी रात बरसतोस..!
कधी धो-धो कोसळतोस,
तर कधी गारांचा मारा करतोस..!
वादळ वारे वीजेसोबत,
गुरे ढोरे अन् माणूसही नेतोस..!
पूर आणून नदी नाल्यांना,
तू सारा संसार वाहून नेतोस..!
गरीब बिचाऱ्या त्या शेतकऱ्यांना,
तू सैरावैरा पळवतोस..!
मेघराजा..रे..वरुणराजा..
तू आम्हाला किती सतावतोस..!
