मधुबन
मधुबन
ऋतुच्या ओंजळीतून सांडले दव भूवरी
जणू दवखड्यांनी नक्षी सुंदर काढली
डोंगराच्या माळेत सजले किती कोहिनूर
जणू वनराणीच्या गळ्यात शोभे चंद्रहार
शोभिवंत रांगोळी गवतफुलात रंगली
शहारलेल्या पानावरती चंद्रकोर कोरली
पाखरू घालते रुंजी कळी काही उमलेेेना
धुक्यात नाहली सृष्टी किरण काही दिसेना
सरिताही स्तब्ध झाली जणू नीलवर्ण दर्पण
कोवळ्या पावली सूर्य डोकावतो मधून
आनंदी आनंद चहूकडे निर्मितीचे चैतन्य
तरुणाईच्या हिरवळीने गर्भारले मधुबन