वेढती गंध हे
वेढती गंध हे


वेढती गंध हे, आठवांचे तुझ्या,
छेडती सूर हळवे जुने
भास हे दाटले, स्पर्श सामावले,
राहती श्वास माझे उणे
मंद झाल्या खुणा, जागल्या का पुन्हा,
साचली दाटली आसवे
वाट ही कोणती, कोणता गाव हा,
बहरली भावनांची फुले
ओळखीचा नसे चंद्र ही आज का,
वेगळे वाटती चांदणे
रात्रही जागते आज माझ्या सवे,
तोडूनी सोडूनी बंधने
सजवते स्वप्न का, गोडशा त्या खुणा,
क्षण तुझे अंतरी ठेवले
अजूनही शोधते, गोड नाते तुझे,
मन असे गुंफले गुंतले
मंद वारा प्रिये, वाहतो सांगतो
आर्तता खोल हृदयातली
एक आसू जसा, निखळते चांदणी
आज विरहात सामावली
का अवेळी अशी, सांजवेळी तुझी
आठवांची फुले वेचणे
अजूनही शांतता शोधते ऐकते
वाजतांना तुझी पैंजणे