देव आला माझ्या घरी!!
देव आला माझ्या घरी!!
देव आला माझ्या घरी...!
वाटलं ना तुम्हाला नवलं
देव आला घरी म्हंटल्यावर
खरं गा सांगतो
पहाट पहाट थाप मारली दारावर
म्हणे उघड दार
उभारलो रे मी तुझ्या उंबऱ्यावर...
मनात म्हंटले याला
दाखवावा इंगा
पुंडलिकाचे करावे अनुकरण
थांब म्हणावे दारात जन्मो जन्मी...
पण
मी कुठे याचा भक्त
आणि कोठे भक्तीत सशक्त
लाचार सदा
लोळण घालतो पायावर
मग कशास करू, नको ते धाडस...
उघडले दार झपकन
पहातो तर काय साक्षात
उभा पांडुरंग समोर
विश्वास कसा ठेवावा...
काहीच कळेना, म्हंटले देवा
आज इकडे कोठे बरे बाबा
म्हणाला मला
आज घाबरलो मी ही...
डोकी कधी फिरतील काही नेम नाही
कलियुग मला आहे रे
म्हणून आलो आश्रयाला
राहतो निवांत इथेच लपून...
कोणा नको सांगू, मी सोडले रे
ते पंढरपूर
झालो मी बेजार,जडला आजार
नको तो शेजार आता वारीचा रे...
काय सांगू तुला
मला उभा ठेवतात चोवीस तास
आपण फिरतात टाळ कुटत
मौज मजा मस्ती आनंदात सारे
मला सांग वेड्या
आता कोण पाहतो रे..?
म्हणून मी आलो तुझ्याच घरी
निवांत राहण्या जन्मभर
आनंदात घेतली मी गिरकी
झालो अचम्बित क्षणभर...
चहा डोंबलावर आपटून
आमच्या रुक्मिणीने
घेतली की फीरकी...
म्हणाली रागात
उठा आज तरी लवकर
घाला देवाच्या डोक्यावर पाणी
हात जोडा एकवार
करा उपकार एकदा
जन्मात पांडुरंगावर
घेईल अंगावर खुळ्यास माझ्या...
मनात मी मांडे भरपूर खाल्ले
माझा खुळ्यास ऐकून, समाधान झाले
वाटले क्षणभर मला
खरचं आला असावा
पांडुरंग अंगात
बायकोच्या.....!!!
