माय मराठी
माय मराठी
माय मराठी
-----------------------------------------
गुज मनीचे होण्यास व्यक्त,
अंकुरती सहज शब्द ओठी,
ध्वनीरुप घेती भाव अंतरीचे,
असे ती पवित्र माय मराठी.
प्रेमळ, वत्सल, स्नेहमयी ,
कुटूंबवत्सल माय माऊली,
अमृतापरी रसाळ मराठी,
देई अवीट मायेची सावली.
भुईकमळासम गोड मराठी,
उमलली नाना रुपे घेऊनी,
अहिराणी, व-हाडी,मालवणी,
प्रमाणीत असे अलंकार लेऊनी.
म्हणी,कथा,ओव्या,पोवाडे,
गाऊनी माय मराठी सजली,
सुमधूर,लयबद्ध, सप्तसुरांनी,
गायकांच्या गायकीत भिजली.
अभिमान वाटे सदा मजला,
मराठमोळ्या माझ्या महाराष्ट्राचा,
दरी,खोरे,डोंगर,कडेकपारीतूनी,
एकच नाद गुंजतो माय मराठीचा.
संतांचीया अभंगरुपी ग्रंथातून,
अपुली माय मराठी व्यापली,
ज्ञानदेव,तुकाराम,रामदासांनी,
उपदेशातूनी संस्कृती जपली.
शिवरायांची तलवार तळपली,
मराठी माणसाच्या रक्षणासाठी,
मावळ्यांसह घेतली रायरेश्वरी,
शपथ स्वराज्य स्थापनेसाठी.
हर्षभराने आज मराठी दिनी,
घेऊ आपण सारे एकच आण,
मराठी मातीचा टिळा कपाळी,
जगी वाढवू माय मराठीची शान.
