मावळतीच्या स्वप्नांचा सोबती
मावळतीच्या स्वप्नांचा सोबती
मावळतीच्या रंगात तो पूर्ण न्हाऊन निघाला होता,
आपलंच प्रतिबिंब का? हे स्वतः लाच विचारत होता..
जग मात्र त्याला पूर्णपणे विसरलं होत,
तोही रमला होता त्याच्या स्वप्नांच्या साम्राज्यात.
तोच राजा होता बुद्धिबळाच्या पटावराचा,विना सैन्य जिंकला होता डाव.
नियतीने मांडलेल्या खेळात तो नव्या खेळी करून जिंकत होता एकेक क्षण.
माणसांच्या जथ्यानी तुडवून टाकला होता प्रदेश
तरी हरला मात्र नव्हता.
वास्तव आणि अपेक्षा यांची सांगड घालत तो रोज स्वप्न पहायचा आपल्याच अस्तित्वाचं.
तो ऊर्जेने भरलेला होता की मनाने तुटलेला होता
आपल्याच शोधात गुंतलेला होता.
आता त्याला भीती नव्हती कारण त्याची सावली त्याला साथ देत होती.
तो अजिंक्य, अभेदी आहे म्हणून तो मावळतीच्या स्वप्नात आपल स्वप्न सत्यात येईपर्यंत लढणार आहे.
तो वाटसरू आहे प्रगतीपथावरचा!