माफ कर
माफ कर
माफ कर बिलकीस बानो स्त्री म्हणून तुझ्या नजरेला भिडण्याचे सामर्थ्य माझ्यात तरी नाही
माझी सदविवेक बुद्धी दडून राहीलीय आत आत खोलवर
मेलेलं मन घेऊन का असेना
मला जगायचयं ताठ मानेन नाही म्हणू शकतं कारण तुझ्यावरील अन्याय समस्त स्त्री जातीवरील कलंक आहे
ओसाड जंगलात पालवीच्या शोधात
चिरडलेलया पानझडीचा कर्कश आवाजही यातना देतो काळजाला,
मात्र संवेदना जिवंत असाव्या लागतात
तुझे ओसाड झाडही आज वणव्यात पेटून राख झालं
आणि आम्ही पहात राहीलो
ते आगीचे लोळ दुरून फार दूरून उठणाऱ्या लाल रेघा
तुझ्या हृदयाच्या चिंधड्याचे हारतुरे त्यांच्या गळ्यात कारण ते संस्कारी होते
आणि तू एक मादी जात धर्म वर्णाच्या आगीत होरपळलेली ते मानव होते
उच्च कुलीन ते ओरबाडू शकतात लचके करू शकतात शिरच्छेद
नी अब्रूशी खेळ त्यांचा रक्तात धर्म भिनलाय संस्कार भिनलेत
हिंस्त्र श्वापदात सुद्धा कनव असते कारण ते पशू असतात
पण हे पेढे वाटतील सत्कार करतील
समस्त स्त्री जातीच्या लाचारीला हसतील.ताठ मानेने समाजात वावरतील
नवी बिलकीस बानो सुद्धा शोधतील.कोणत्या तोंडाने सांगू तुला आणखी धीर धर
एक मात्र कर! आम्हाला खरच माफ कर!
