येऊ नकात ज्योतिबा
येऊ नकात ज्योतिबा
येऊ नकात ज्योतिबा शाळांच्या तपासणीसाठी ,
तुम्हालाच लाज वाटेल त्या चार भितींतला धंदा पाहून ...
उगा तुमचे ही हेलपाटे होतील पोलीस ठाण्यात सहाव्या महिन्याच्या गर्भार मुलीच्या बापासारखे...
तुमची जातिवंत ताठ मान वाकली जाणार नाही
टेबलाखालचा व्यवहार पाहण्यासाठी ...
आलाच तर तुम्हालाही निवडावा लागेल रंग एखादा
भगवा, निळा, हिरवा, लाल....
नाहीच निवडला तर तुमचीही अनुदानाची फाईल
धूळ खात पडेल बंद खिडक्या बंद दरवाजाच्या खोलीत ...
इथं सत्ताधारी पक्षांचे गुणगाण लिहिलं जाईल पुस्तकांच्या पानात,
ते ही तुम्हाला सहन करावं लागेल...
आत्ता अवघड आहे शिक्षक होणं,
झालाच चुकून तर शिकवणं राहुद्यात राजकीय कामं ही करावी लागतील ज्योतिबा...
येताना सावित्रीला ही घेऊन या
एखादी शिकवणी ही टाकता येईल बाहेर खर्चासाठी...
बघा ज्योतिबा,
जमत असेल तर या हं !
उगा स्वातंत्र्य भारतात तुमची तारांबळ नको........!!