माणूस थांबला आहे
माणूस थांबला आहे
खेळ निसर्गाचा रंगला आहे
विषाणू सर्वत्र पांगला आहे
उ:शापासाठी निसर्गाच्या
माणूस थांबला आहे
विलगीकरणांच्या कक्ष्यांमध्ये
एकेक संशयित कोंबला आहे
सुतका एवढ्या काळ पूर्ततेसाठी
माणूस थांबला आहे
निसर्ग विरूद्ध मानव युद्धात
जीवलगांचा श्वास भंगला आहे
होत नसलेल्या अंतिम दर्शनासाठी
माणूस थांबला आहे
चार दिसांच्या रोजंदारीसाठी
श्रमिक खोळंबला आहे
सुरळीत दैनंदिन जीवनासाठी
माणूस थांबला आहे
आसमानी सुलतानी संकटांमुळे
शेतकर् याचा जीव टांगला आहे
आशाळभूतपणे मदतीसाठी
माणूस थांबला आहे
अत्यावश्यक सकल सेवकवर्ग
अविश्रांत परिश्रमाने आंबला आहे
घटकाभर विरामासाठी
माणूस थांबला आहे
शह काटशहाच्या खेळात
राजकारणी रंगला आहे
बोटाला शाई लावून घेण्यासाठी
माणूस थांबला आहे
नजरकैदेतील वेळ घालवण्यासाठी
नानाविध छंदात दंगला आहे
सुटकेच्या आदेशाची वाट पाहत
माणूस थांबला आहे
अभूतपूर्व या बिकट काळातही
माणूसकीचा सागर ओथंबला आहे
खारीचा वाटा उचलण्यासाठी
माणूस थांबला आहे
शतकात येणार् या महामारीमागे
उद्देश निसर्गाचा चांगला आहे
आकाशगंगा काबीज करण्यासाठी
माणूस थांबला आहे
