माझं कट्ट्यावरलं विश्व
माझं कट्ट्यावरलं विश्व
मला नेहमी नवीन वाटणारा कट्टा
कधी माझा झाला, कळलंच नाही
माझ्या मनातलं विचारांचं वादळ
कधी या कट्ट्यावर आदळलं, उमगलंच नाही
कट्ट्यावर छेडलेला अनोखा विषय
आणि त्या विषयावर झालेला परिसंवाद
कधी त्याच त्या चघळलेल्या गप्पा
आणि त्यातून मिळणारा वेगळाच आस्वाद
वादातून वर येणारे सर्वांचेच प्रश्न
निर्विवादपणे चटकन सुटणारी जागा
ताणलेल्या मनांना काही क्षणासाठी
जवळ आणणारा एक धागा
याच धाग्यात आयुष्य
कायमचे ओवले गेले, हे जाणवलंच नाही
मला नेहमीच नवीन वाटणारा कट्टा
कधी माझा झाला, हे कळलंच नाही
कट्ट्यावरला अभ्यास म्हणजे
हाताळलेली अनेकविध प्रकरणं
केलेल्या चुका एकत्र येऊन सुधारणं
यांतच होतं आयुष्याचं घडणं
प्रत्येकाच्या आयुष्यातलं
मैत्रीच्या नात्याचं अनमोल बंधन
कट्ट्यावरली मैत्री म्हणजे
विश्वासाचं, प्रेमाचं, आपुलकीचं गोंदण
ह्या कट्ट्यावर जोडली गेलेली नाती
कधी मनावर गोंदली गेली, वळलंच नाही
मला नेहमीच नवीन वाटणारा कट्टा
कधी माझा झाला, कळलंच नाही
सतत वर्दळ असणारा कट्टा
काही वेळासाठी एकटा पडला
जुनी मैत्री साठून ठेवत
नव्या मैत्रीसाठी सज्ज झाला
आमच्या वाट्याला आल्या
केवळ कट्ट्यावरल्या आठवणी
त्या कडू गोड आठवणी बरोबर
मिळून गायलेली आयुष्याची गाणी
हे आयुष्याचं गाणं मला असंच
अविरतपणे गायचं आहे
मला कट्ट्याच्या आठवणीत
मनसोक्त रमायचे आहे
