माझी कथा माझी व्यथा
माझी कथा माझी व्यथा
कुणा सांगू सांग सखी माझी गं कथा
कुणाकडे मांडू माझ्या अंतरीची व्यथा
नकोशी म्हणती मज जन्माआधीच आईबाप
उदरी आले मातेच्या हेच का माझे पाप?
बालपणीचे लाड कधी मी पाहिलेच नाही
मातापित्यांचे प्रेम कधी लाभलेच नाही
मुलगी म्हणूनी ठेविले मज शिक्षणापासून वंचित
सांग सखे कसे घडवावे मी माझे संचित
मोलमजुरी करुनी झाले मी लाचार
संसाराला मायपित्याच्या बनले मी आधार
परि महत्व माझे त्यांना कधी समजले नाही
माझ्यासाठी हृदय तयाचे प्रेमाने भरले नाही
१८ वर्षे पूर्ण होताच केली लग्नाची घा
ई
हुंड्यासाठी घालविली आयुष्यभराची कमाई
कर्तव्यातूनी त्यांच्या झाले आईबाप मुक्त
पण मज दिली आयुष्यभराची सजा सक्त
नवरा करून दिला अडाणी अन व्यसनाधीन
आयुष्य सारे झाले माझे दीन अन क्षीण
लोकांची धुणीभांडी पुन्हा नशिबी आली
कसे सांगू सखे पदरी निराशाच आली
आता मात्र एकच आशा आहे माझी मुलगी
तिच्यासाठी राबते भरते पोटाची खळगी
शिक्षण अन संस्काराने बनवेन तिला मोठी
मुलगा वंशाचा दिवा ही परंपरा ठरवेन खोटी
बनूनी पणती ती उजळेल आमचे जीवन
मुलगीच आहे अभिमान याचे होईल उदाहरण