मी बंदिस्त
मी बंदिस्त
रूढी परंपरांच्या चक्रव्यूहातून कधी होणार मुक्त
सत्तर वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही अजून मी बंदिस्त
देवी म्हणूनी , माता म्हणूनी गाती माझे गोडवे
बोलाची कढी बोलाचाच भात याचा प्रत्यय इथे घडे
अत्याचार , बलात्कार होत आहेत पदोपदी
माता , भगिनी आठवत नाहीत दिसते फक्त मादी
जगाबरोबर चालताना बसे विकृत धक्का
वासनांध नजरा सोडत नाहीत एकेक मौका
माझ्यावरील अत्याचारांचे खापर फुटते माझ्याच माथी
म्हणे, तोकड्या वस्त्रांनी ओढवती घाव आपल्या पाठी
मीच का पाळायची बंधने अन अडकायचे चौकटीत
मलाही वाटे विहारावे स्वच्छंदी, गावे जीवनाचे गीत
एक माणूस म्हणून मला मुक्त जीवन जगायचे आहे
बंदिस्त करणारी प्रत्येक चौकट नेटाने तोडायची आहे
संविधानाने दिलाय मलाही स्वातंत्र्याचा अधिकार
गुलामीच्या चौकटीत बंदिस्त होऊनी आता न राहणार
महिला सबलीकरण असे माझ्याच मनगटात
अबला न मी आता, हे जगी सांगणार थाटात