मलाही मनसोक्त जगायचंय
मलाही मनसोक्त जगायचंय
पहाटे चारचा गजर बंद करून
पुन्हा चादर घेऊन मस्त झोपायचंय
सगळी टेन्शन्स , कामं दूर करून
मलाही मनसोक्त जगायचंय
सकाळी उठल्यावर चहा घेता घेता
आरामात वृत्तपत्राचं वाचन करायचंय
धावपळीला आता बगल देऊन
मलाही मनसोक्त जगायचंय
ऑर्डर देऊन गरमागरम पोह्यांची
सोफ्यावर निवांत लोळायचंय
पोहे अन चहाचा आस्वाद घेऊन
मलाही मनसोक्त जगायचंय
मैत्रिणींबरोबर पिकनिकला जाऊन
धमालमस्तीत पुन्हा नव्याने फुलायचंय
मनात येईल ते सर्व बिनधास्त करून
मलाही मनसोक्त जगायचंय
मोलकरणीसारखं राब राब राबून
आता अजिबात नाही दमायचंय
खऱ्या अर्थाने मालकीण बनून
मलाही मनसोक्त जगायचंय
जग काय म्हणेल, याचं
मला काय करायचंय ?
फक्त स्वतःसाठी वेळ देऊन
मलाही मनसोक्त जगायचंय