माझा बाप शेतकरी
माझा बाप शेतकरी
शेतकरी हा भल्या पहाटे
सा-यांसाठी उठे
करूनी न्याहारी, झुणका भाकरी
कामावरती निघे।।
पायी रुतती काटे तरीही
तो न कधी थांबला
पाण्यासंगे शेतामध्ये
रक्ताचा सडा शिंपला।।
निसर्ग सोडी साथ मधुनी
तो न कधी हारला
हिंमत सारी एकवटूनी
पुन्ह लागे कामाला।।
डोईवर कर्जाचा डोंगर
तरीही धरे मनी आस
जगण्या हाती घेई नांगर
उद्या मिळेल सुखाचा घास।।
शेतमाल तो गोळा करुनी
बाजाराला जाई घेऊनी
दलाल, अडते बोली लावती
भाव कष्टाचा खाली पाडोनी ।।
अडून बसती एका ठायी
माणुसकी सारी जाळोनी
मानवातले दानव सारे
जाती त्याचे लचके तोडुनी।।
खिन्न खिन्न तो सुन्न जाहला
कष्ट विके कवडीमोलाला
हताश होऊनी जडपावली
तसाच बिचारा घरी परतला।।
पाही लेकरांच्या मुखाला
जाऊनी त्यांना घट्ट बिलगला
आज निजू द्या मला सुखाने
स्वर त्याचा होता भिजलेला।।
पत्नीच्या भाळावरचे कुंकू पाहून
कंठ त्याचा आला गहिवरून
डोळे घेतले गच्च मिटून
गेला त्वरेने आत निघून।।
पोशिंदा तो सा-या जगीचा
उपाशी तो तसाच निजला
पालापाचोळ्याचे जीणे
प्राण त्याचा आता न उरला।।
