वावर पेरलं
वावर पेरलं
काय सांगू राम्या तुले
म्या आणलं आज बियाणं
नाही घरात मायो
अरे रुपयाचं नाणं ।।
सांगितलं यंत्र शामरावच
टाकली करून मशागत
पण नाही केली आजून
राजा म्या डोक्स्यची हजामत ।।
चार पोटे सांगितले
डोबा म्हणल सरकी
जेवणच नाही धकत
मग कुठून येन भाऊ डरकी ।।
शावकारले मागून पैसे
कसतरी मजूर तोडलं
काय सांगू राम्या तुले
म्या यंदा वावर पेरलं ।।
अक्का काकू मावशी
साऱ्याले विचारून थकलो
तण पाहून वावरतल
घरच्या घरी सोकलो ।।
लावली छातीले माती
अन विळा घेतला हाती
कोठून आणू मजूर लेका
शेम्बडे पोटे लावले पाती ।।
केलं निंदण चालू
तण हातात नाही सापडे
निंदता निंदता पोटे
सारे अर्धे झाले वाकडे ।।
करून अशी फजिती
निंदनाच ओझं झेलल
काय सांगू राम्या तुले
म्या यंदा वावर पेरलं ।।
