माहेरची ओढ
माहेरची ओढ
ओढ जायला माहेरा
लागे मायेच्या सागरा ,
खोली प्रेमाचा पदर
डोळ्यातलं पाणी सारं ...||धृ||
वेडी ही पाऊलवाट
पानांचा सळसळाट ,
सारे देई मला हाक
भारी माहेरचं सुख ....||१||
फुले मोहोर आंब्याचा
गंध दाटला चाफ्याचा ,
राघू - मैना बोले कानी
अन् तुळसी अंगणी ....||२||
आई - दादा वाट पाही
दादा वहिनीची घाई ,
उभे सारेच दारात
माझी वाट पाहतात ....||३||
कधी येईल माहेरी
छकुली लाडकी भारी ,
किती जीव लावतात
सुख मावेना मनात ....||४||
चाहूल सणासुदीची
स्वारी ती भाऊरायाची ,
येईल उद्या सासरी
हळवं मन सावरी ....||५||
