*बापाचं प्रेम*
*बापाचं प्रेम*
बाप छत घराचं, अन घराचा आधार ,
त्याच्याविना नाही चाले , चाले हा संसार ..||धृ||
बाप छत घराचं........
सुख देउनी घराला , घेई दुःख डोंगराचे ,
देई हसू आपल्याला , ओढे ओझे संसाराचे ,
दुःख मनामध्ये जरी , फोडी हास्याचा पाझर ,
दाखवी आनंद , तरी कसा चेहऱ्यावर ..||१||
बाप छत घराचं.....
राब राब रात्रंदिन , काम करी वणवण ,
प्रेम जरी डोळ्याआड , लपे अश्रुही अजाण ,
नाही डोळ्यांना दिसे , पण जीव लावी फार ,
मनी प्रेम असे , त्याचे साऱ्या कुटुंबावर ..||२||
बाप छत घराचं.......
लेकी लाडक्या- बापाच्या , त्यांना जपे फुलावाणी ,
शिकवूनी - सावरूनी , वाढवी त्यांना प्रेमानी ,
येई पाणी डोळ्यांतून , लेकी सासरी गेल्यावर ,
होई आभाळ ठेंगणे , लेकी खूप शिकल्यावर ..||३||
बाप छत घराचं......
लेक मोठा झाला आता , त्याच्या चेहऱ्यात पाही ,
माझ्याहूनही हो मोठा , एवढंच स्वप्न राही ,
उर भरून येई , लेक मोठा झाल्यावर,
मन फुलून जाई , त्यानं नाव कमवल्यावर ..||४||
बाप छत घराचं ........
