गीत निसर्गाचे गावे
गीत निसर्गाचे गावे
शब्द शब्द एकेक गुंफावे
काव्य बनून ते बहरावे
गंध असे त्यांचे दरवळावे
गीत मी निसर्गाचे गावे ॥धृ॥
हिरवे पाचू जणू भासे रान
असे शब्दचि माझे खरे धन
श्रावणसरीतले हे मोती
त्या सरींगत शब्दांनी बरसावे ॥1॥
मंद वारा चारी दिशांना
वाही घेऊन फुलगंधांना
शब्दानेही ओठांतून ओसंडून
त्या वार्यागत चोहीकडे वाहावे ॥2॥
सृष्टीला भगवंताचे वरदान
निसर्ग सुंदर हिरवे रान
उपमा देऊन निसर्गाला ह्या
शब्द अलंकाराने असे सजावे ॥3॥
रिमझिम पावसात मयुर पंख फुलले
मोर बावरे रानी नाचण्या आतुरले
त्या पावसाच्या सरीत नाचण्या
मग शब्दफुलांनी असे भिजावे ॥4॥
जसे फुलांभोवती फुलपाखरे रंगीत सुंदर
झाडांवर कोकिळा गीत गाई मधुर
तसे शब्द मनी करती घर
जणू हृदयात खोलवर शब्दांनी रुजावे ॥5॥
