माहेराची माया
माहेराची माया
लेक आली माहेराला, तिला लाभू द्या विसावा।
सासरी गं नांदताना, येई मनाला थकवा॥
नका उठवू गं तिला, कष्ट करून दमली।
नका करू पाय-रव, निजे माझी गं बाहुली॥
राबतसे रात्रंदिनी, भार वाहते संसारी।
जगाच्या ह्या स्पर्धेमध्ये, चुरशीची हिची नोकरी॥
सूर्याच्याही आधी तिचा, दिनक्रम होतो सुरू।
सांभाळते घर-दार, आणि नोकरीचे तारू॥
चार दिसांसाठी आली, माहेराचे सुख घ्याया ।
आईला गं गळामिठी, बाबा हौस पुरवाया॥
केले कोडकौतुक मी, खाऊ घातले प्रेमाने।
शीण घालवाया तिचा, थोपटले मी मायेने॥
झोपली माझी लाडली, स्वप्न पाहते सानुली।
तिच्या सुखी संसाराची, चित्रे नयनी रंगली॥
राजाराणीच्या संसारी, यावी एक सोनपरी।
मांडेल ती भातुकली, माझ्या गोड लेकीपरी॥
स्वप्नांच्या हिंदोळ्यावर , घेई लेक ऊंच झोके।
स्वप्नात ती दंग झाली, निरखते मी कौतुके॥
सुखी कर देवा तिला, देई पूर्तता स्वप्नाला।
देई मायेचे माहेर, माझ्या लाडक्या लेकीला॥
