लुटा-लुटा हो
लुटा-लुटा हो


लुटा-लुटा हो आमुचे खळे अन्...
फुलवा खुशाल तुम्ही स्वार्थी मळे
ठेवा थोडी जाण रे आमुची...
आम्ही पिकवतो म्हणून तुम्ही खाता
आम्ही शेतकरी, कष्टकरी गडी...
तुम्ही अडवता, नडवता, रडवता
आम्ही तुम्हास घास भरवतो
तुम्ही काडीमोल भाव देऊन लुटता...
आम्ही रक्ताचं पाणी करून पिकवतो
तुम्ही दिवसा राजरोस लुटता?
आम्ही जगाचे पोशिंदे अन्...
तुम्ही आयत्या बिळावर नागोबा...
सरकार निसर्ग व्यापारी सारेच कोपतात
चोरा-चिलटांच्या तावडीतून काय उरतं?
पोराबाळाचं शिक्षण, दुखणं-भान...
तुम्हीच सांगा गड्यांनो आम्ही जगावं कसं?
न्हाती-धुती पोरं उजवावी कशी?
आम्ही कुठवर घ्यावी गपगुमान फाशी?
अंत नका पाहू गड्यांनो नाही तर काय होईल...
तिफण उभी राहिल, हाती रुम्हणं येईल...