#Love Language
#Love Language
प्रेमाचे रंग अनेक,प्रेमाच्या परीभाषा अनेक
लग्नानंतर नव्याने फुलणारे प्रेम
वय झाल्यानंतरही पुन्हा नव्याने बहरणारे
साठी नंतरचे प्रेम
कारण माहित असते त्यांना
एकमेकांशिवाय कुणीही
जपणार नाही आपल्याला
रोज सकाळी उठून हळुच ती त्याच्या जवळ जाते
श्वास त्याचा चालु आहे का याची खात्री करते
देवाची आरती ऐकु आली की,त्याला ही हायसे वाटते
गुडघेदुखी हिची बरी आहे याचे चांगले वाटते
एकमेकांना जपत दोघेही एकेक दिवस काढतात
कधीही कुणाला बोलावणं आलं तर दुसऱ्याचे काय होणार
याच काळजीने मनं त्यांची झुरतात
कधी गजरा, कधी भेळ
कधी समुद्रकिनाऱ्यावरची निवांत वेळ
कधी शुगर तर कधी बि.पी.च्या गोळ्यांचा मेळ
कधी आयुष्यभर जगलेल्या आठवणींच्या गप्पांचा खेळ
आयुष्याच्या या वळणावर सोडुन सारे वाद
हेवेदावे आणि मतभेद
दिवसेंदिवस वाढत जाते
दोघांचे साठी नंतरचे प्रेम!!
