कवितेचा नाद
कवितेचा नाद
एका नव्याको-या पांढ-याशुभ्र कागदाचं
नवं कोरं करकरीत भविष्य असलेलं आयुष्यं.
आपल्यासारख्यांच्या भनंग ओबडधोबड ठिगळं झालेल्या आयुष्याला त्या को-या कागदावर चितारता चितारता खराब करायचं आणि पुन्हा या ही पेक्षा क्रूर,कटू बनत,हद्दपारी करत शब्द आणि लेखनी यांचा सहवास आणि हा त्यांचा रोमान्स.
हे न घडण्याइतपत इतकं असं जातीधर्मांध होऊन मोबाईलवर टाईप करायचं.
व ही एवढी सगळी खोचक विकृती त्या कागदावर रचवता रचवता त्या सुंदर कागदालाच पुन्हा शिकवायची आपली खोडसाळ खोचक वृत्ती पचवण्याची अक्कल.
मीच तो प्रणयबाज लेखक या भ्रमाने चौफेर धुमसायची आपली भ्रष्ट झालेली लेखनी,
त्या शुभ्र कागदाच्या अंगभर ओळींवर
तृप्त तृप्त होईपर्यंत.
हा कागदंच आपली प्रेयसी आहे असं समजून गृहित धरायचं लिहिता लिहिता की
या कागदाचा जन्म यासाठीच झालाय या आशयाने शोषत रहायचं त्या पानाचं सुंदर कोमल आयुष्य,
आपल्याच चारित्र्यहिन आयुष्याने वरच्या अंगापासून खालच्या अंगापर्यंत अधाशी लेखक असल्यासारखं.
त्यातूनंच नविन नविन विचारांना शब्दांमध्ये जन्म द्यायचा आणि त्या सदराचं नामकरण करून
त्याला कविता म्हणायचं?
आणि वाह वाह घेत सरते शेवटी या सगळ्याला पुन्हा आयुष्य असंच आहे असं समजून आपल्या भरकटलेल्या आयुष्याची नोंद ठेवण्याच्या हट्टापायी
त्या वाट न चुकलेल्या सुंदर नव्या को-या कागदाला देखील डाग लावायचा अनावधानाने.
व शेवटी लिखानाचे आयुष्यपतन झाल्यावर आपापला गाशा गुंडाळायचा आणि त्या को-या कागदाचं ही गर्भाशय आपणंच खराब करायचं.
हा बेधुंद कुठला प्रवास कुठल्या दिशेने झाला म्हणून नविन खटाटोप करत स्वत:च्या शोधाच्या नादाला लागून नविन चाचपड-चाळणी-पडताळणी करत पुन्हा नविन कोरा करकरीत कागद घ्यायचा
आणि पुन्हा तेच सत्र आयुष्यभर चालू ठेवायचं.
आयुष्यच एक कविता असल्यासारखं.

