कविता
कविता
शेवटचे पान....
डायरीचे शेवटचे पान
ठेवले तसेच कोरेकरकरीत
ठाऊक नाही माझेच मला
काय आहे विधिलिखित
पहिल्या पहिल्या पानावर
दुडदुडणाऱ्या आठवणी
आई बाबांचे बोट धरुन
खेळणारी ती परीराणी
नंतरच्या काही पानांवर
छान अल्लडशा आठवणी
मनसोक्त मारलेल्या गप्पा
अन् आठवणीतील गाणी
पुढच्या काही पानांवर
जबाबदारीचे ते ओझे
घरसंसार रोजची ती कामे
दिवस सरले असेच माझे
पूर्वार्ध सरला कुठे आताशा
मिळे आता थोडा वेळ
कथा कविता गाणी गोष्टी
हरेक पानांवर चाले खेळ
मन सांगत असते काही
तेव्हा आतूर होती कान
न लिहिता तसेच कोरे
डायरीचे शेवटचे पान
@अरुणा गर्जे
