कविता...
कविता...
काही सांगाया पाहतो...
एक जीर्ण शीर्ण वाडा
काही सांगाया पाहतो
परि कुणा नाही वेळ
तेव्हा तो हिरमुसतो
तडा गेलेल्या त्या भिंती
त्याचा उडालेला रंग
जणू सांगतो आम्हाला
आता झालो रे नि:संग
कधीतरी वाटे त्याला
यावे दिवस ते खास
विचारावे कुणीतरी
त्याला एवढीच आस
भल्यामोठ्या या वाड्याची
काय होती आधी शान
वाड्याकडे बघायचे
सारे हरपुनी भान
भरलेला वाडा जणू
वाटायचे रे गोकुळ
किती किती गाजावाजा
होता आनंद निर्मळ
झाला सुनसान आता
नाही सोसवत काही
कोसळेन कधी केव्हा
भरवसा याचा नाही
आयुष्याच्या सांजवेळी
मन झाकोळून येते
जीर्ण शीर्ण या वाड्याची
बघू याद कुणा येते?
@अरुणा गर्जे
