कविता
कविता
कधी उठेल पेटुनी...
मन झाकोळले आज
साऱ्या झाकोळल्या दिशा
आले भरून आभाळ
सारी मावळली आशा
असा कसा रे कोपला
बरसतो वेड्यावाणी
नाही वाटत आताशा
पावसाची गावी गाणी
आले होते रे हाताशी
कसे पिक भरघोस
थय थय तू नाचला
केली सारी नासधूस
सोसवेना रे आताशा
कर्ज डोईवर फार
कसे कळेना रे तुला
नको करू ना बेजार
कसे कळेना कुणाला
कुणा दिसेना रे कसा
धाय धाय रडणारा
शेतकरी वेडापिसा
कंटाळून गेला आज
आश्वासने ती ऐकुनी
कळायचे सुद्धा नाही
कधी उठेल पेटुनी
@अरुणा गर्जे
