STORYMIRROR

Seema Gandhi

Inspirational

4  

Seema Gandhi

Inspirational

कुटुंब जोड वेळ

कुटुंब जोड वेळ

1 min
505

लक्ष्मणाच्या आखलेल्या मर्यादा रेषेची मालकीणच जणू ...

घराच्या आतही आणि बाहेरही...

सांधायच्यात मला नात्यांच्या भींती थोड्याफार ढासळलेल्या,

अन् उसवलेली शिवण मलाच शिवायची आहे...

हे कसब तर सुगरण पक्षाचं मला जणू देणंच आहे...


आठवणीतले बरेचसे क्षण मुठीत गच्च ठेवलेत, ज्याच्या त्याच्या वाट्याचे...

जो जसा भेटतो तसे जातात सामोरे त्याला...


मन घुटमळते सदा या चार भींतींच्या आत, 

माझी सारी कामे अलवार...

पण कधीकधी बसते पसाऱ्यात कवितेच्या...

अन् हरवते बऱ्याचदा स्वप्नात स्वतःच्या...


काही ठिगळ लावते भविष्यासाठी,

अन् काबूत ठेवते वर्तमानाला...

बहुदा मीच असावी संस्कृती... 

अन् ह्या घराची साम्राज्ञीही...


कधीकधी नाही हलत पाने इकडची तिकडे माझ्या शिवाय...

बऱ्याचदा मीही असते त्या भ्रमात...


गृहिणीपण मिरवणंही सोप नसतं,

कुठल्या कप्प्यात काय ? हे ठेवावंच लागतं ध्यानी,

बऱ्याचदा इतरांच्याही मनाचे कप्पे लागतात उघडावे अलगद...

जोडावे लागतात सुखदुःखाचे धागे अलवार...

घराचा कानाकोपरा असतो माझा मित्र,

साऱ्या घराच्या ,कुटुंबाच्या अणूरेणूतुन मीच असते धावत पळत...

काही क्षण सुटतात... काही भांडतात...

काही नकळत हरवतात...

कधी वेळ असो की नसो,

कधी असतो हात सुगरणीचा, 

तर कधी अळणी-नावडतीचा... 

होते कधी उदास मग,

पण पदर खोचून लागते लगेच कामाला...


बऱ्याचदा असते मी वाहक संस्कारांची...

ह्या पिढीचे त्या पिढीसाठी पोहचवणारी...

जुन्यातलं चांगलं अन् नव्यातलं पेलवणारं शिवधनुष खांद्यावर घेऊन मिरवते...


कधी कधी होतं हसूही.!

"किती वेंधळी ही?"

तेव्हा मात्र नसते मी नव्या पिढीची अन् जुन्या पिढीचीही,

लटकते मध्येच जुन्या-नव्या च्या तंत्रात,

तरीही मात्र असते एखाद्या मल्लिकेच्या थाटात...


कधी कधी मी उसळते...धुमसते...

एखाद्या वादळागत भिरभिरते...

पण मग माझं मलाच व्हावं लागतं शांत...

मलाच ठेवावी लागते जगरहाटी...


स्रीत्वाच्या साऱ्या सुखदुःखांना अंगाखांद्यावर मिरवते....

सोशीकता तर नसानसातून पळत असते...

आईपणही मिरवते सोशीकतेच्या मर्यादेत राहून...


काही क्षण रुसतात... काही क्षण दुरावतात... 

अन् तेवढ्याच तीव्रतेने गळाभेटही घेतात...

आयुष्याला सामोरे जाताना राहीन

उदबत्तीसारखी गंधाळत...

अन् समई सारखी उजळत...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational