कसं होऊ उतराई
कसं होऊ उतराई
रात्रंदिन झिजलीस माझ्यासाठी आई
सांग ऋणातून कसं होऊ उतराई ।।धृ।।
पापणीचा दिवा केला हाताचा पाळणा
माझ्यास्तव केली किती जीवाची गं दैना
मला कोणत्या जन्माची लाभली पुण्याई ।।१।।
रात रात जागलीस माझ्या माये पोटी
उपाशी राहून मला दिली तूप रोटी
देवापाशी मागितली माझीच भलाई ।।२।।
उपकार माझ्यावर तुझे कोटी कोटी
घातलेस माझे किती अपराध पोटी
गूण माझे सांगतांना वाटे नवलाई ।।३।।
रानोमाळ तुडविले किती काटेकुटे
ठेचाळले पाय जेव्हा लागलेत गोटे
ऊरी दुःखाचा उमाळा, मुखात अंगाई ।।४।।
आई तुझ्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा वाटे
तुझे गुण वर्णायाला शब्द होती थिटे
थिटा नभाचा कागद, सागराची शाई ।।५।।
