करुणा वारकऱ्याची
करुणा वारकऱ्याची
ज्येष्ठी एकादशी / निघे वारकरी/
दर्शना पंढरी / माऊलीच्या //(१)
वारकरी शांत / खंत मनी लागे/
पंढरीस जाणे / अशक्यचि //(२)
कधी नाही माझी / चुकली ही वारी /
दुःख दाटे ऊरी / कैसे साहू ?/(3)
संकट रोगाचे / आले विश्वावर /
तूच आम्हां तार /विठूराया //(4)
नियम पालन / सर्वांसी चांगले /
गर्दी टाळा भले / आदेशचि //(5)
देव विठूराया / भक्तीचा भुकेला /
जाणतो मनाला / भक्तांचिया //(6)
असे देह जरी / देहरुपी घरी /
मानस मंदिरी / विठ्ठलाच्या //(7)
तुझ्या कृपे व्हावा / पाऊस चांगला /
जाण कृषीवलां / विठूराया //(8)
आषाढीला यंदा / यावे भक्तांघरी/
दर्शना आतुरी / भक्तगण //(9)