कोरोना
कोरोना
भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी
मुंबईला गेलो
पुढे काहीतरी चांगलं होईल
म्हणून तिथेच राहिलो
राब राब राबत होतो
साहेबांची मर्जी जिंकत होतो
मुंबईच्या त्या मायानगरीत
स्वतःचं बस्तान बसवत होतो
हळूहळू आता मी तिथेच एकरूप झालो
गावाकडून आईचा कधीतरी येत असे फोन
हाल हवाला विचारून झाला की नेहमीचं पालुपद
कधी करशील एकाचे हात दोन
मी मात्र कारण देत टाळत राहिलो
आता काळ भरपूर लोटला होता
मुंबईकर होण्याचा गावाकडून मान मिळाला होता
कधीतरी सहा महिन्यात गावाकडे फेरी व्हायची
गावकरी मित्र मंडळी आपली गरज सांगायची
मी मात्र गप्प मान ती पुरवत राहिलो
मुंबईत आता स्वतःचा आसरा झाला होता
गावच्या वाड्यापेक्षा तिथं बंगला मोठा होता
सोबतीला आता बिऱ्हाड थाटलं होतं
भावाच्या शिक्षणासाठी भरपूर पैसे साठलं होतं
चा
रचाकी घेऊन रुबाबात गावाकडे गेलो
अचानक एके दिवशी हा कोरोनाचा आला रोग
काम धंदा सोडून घरात बसण्याची पाळी आली
हा कुण्या जन्मीचा भोग
हळूहळू लॉकडाऊनचा काळ वाढत गेला
साठवलेल्या पैशाचा तळ संपत गेला
एक वेळ अशी आली उपासमारीची पाळी आली
शेवटी खुडूक मुडक गोळा करून गावाकडे निघालो
गावाकडं आल्यावर आमची सोय लावली होती गावकुसाबाहेर एका मैदानावर
जिथं गावातली लहान पोरं खेळत होती आजवर
राहायला बंगला नव्हता होती एक झोपडी
लांबवर लावली होती चार चाकी गाडी
कुणीच लक्ष देत नव्हतं कुणी जवळ येत नव्हतं
डोळ्यातल्या आसवांसोबत आता मी ही खचून गेलो
आई मात्र भाकरतुकडा घेऊन नित्यनियमाने येत असे
हे बी दिस जातील असं म्हणून पाठीवरून हात फिरवत बसे
कोरोनाचा रोग कधीतरी जाईल
माणसांचं वागणं मात्र कायम मनात राहिल
अशा परिस्थितीमध्ये मी नाही संपलो