किमया पावसाची
किमया पावसाची
करपलं रान देवा,
भेगाळली ही जमीन......
झाले अंग लाहीलाही,
नको झाले हे जीवन......१
नको अशी फिरू पाठ,
नको घेऊ रे परिक्षा.....
धाव घे रे मेघ राजा,
पुरी कर तू प्रतिक्षा......२
व्याकुळली काळी आई,
सोसे नांगर हासत.....
झाली सज्ज स्वागताला,
मेघा येरे बरसत.......३
कृपा केलीस तू देवा,
झाली आभाळाची माया.....
आला बेफाम पाऊस,
झाली सुगंधित काया......४
आला हुरूप कामाचा,
सज्ज झाली बैलजोडी...
चला लागू पेरणीला ,
सुटे भविष्याची कोडी.....५
झाले रे चीज कष्टाचे,
डोले हिरवे सपानं.....
शालू हिरवा नेसून,
शोभे भरल्या ओटीनं....६
आली बहरूनी आई,
तरारली पाने फुले.....
देठदेठ ताठरले ,
मन आनंदात डुले....७
किती गाऊ गुणगान,
दिठ काढू धरणीची.....
आले आनंदे उधाण,
चिंता मिटली उद्याची.....८
आम्ही दोघे राजा राणी,
कष्ट करू संगतीने.....
पुरे करू स्वप्नसुखे,
नांदू आनंदे जोडीने.....९
