जीवन गाणे
जीवन गाणे
जन्म मिळाला माणसाचा
असे थोर भाग्य अपुले
पडल्या गाठी ऋणानुबंधाच्या
जणू अंगणातील प्राजक्तफुले....
व्यक्ती तितक्या प्रकृती असती
प्रत्येकाची वेगळीच अदा
हलकेच घ्यावे हसण्यावारी
का मग यावी नात्यावर गदा....
मळभ मनाचे दूर सारूनी
फुलावे स्वच्छ कौमुग्ध नभांगणी
विसरून सारे रूसवे फुगवे
सोडून देवू कटू आठवणी....
कर्म अपुले करीत रहावे
कर्तव्याप्रती जागरूक असावे
अपेक्षांची नको वाच्यता
जीवनगाणे गात रहावे.....
आपले आत्मपरीक्षण करावे
माज नको सत्ता , विद्वत्तेचा
मधुर वाणी , विनयता अंगी
अर्थ खरा बुद्धिमत्तेचा.....
होतात चूका सर्वांकडूनी
नाही याला अपवाद कुणी
चूकलेल्याला माफ करावे
हरीनाम स्मरावे ध्यानीमनी.....
