सिंधुमाई
सिंधुमाई
पुरूषप्रधान समाजाच्या अग्नीकुंडात
होरपळून निघालीस तू माई
कणखर उभी सावरून स्वत:ला
झालीस कित्येक अनाथांची आई
घेऊन लेकरू भटकलीस दारोदारी
लढलीस किती नशीबाच्या भाळी
लांडग्यांपासून वाचविण्या अब्रू
केलेस तू स्मशानालाही जवळी
सोसल्या जरी झळा उपेक्षांच्या
घास भरविलास तू भुकेल्यांना
स्वतः झेलूनी उन्हाचे चटके
दिलीस सावली अनाथ लेकरांना
अथांग पात्र तुझे मायेचे
पाजलेस पाणी तहानल्या जीवांना
सिध्द केलेस 'सिंधुत्व' तुझे
किती सिंचलेस उजाड रानांना
भरलीस ग झोळी लेकरांसाठी
करूनी वाऱ्या , देऊनी भाषणे
देशोदेशी डंका तुझ्या कर्तृत्वाचा
फिकी तुझ्या कार्यापुढे खोटी आश्वासने
पोरक्या जीवांची वात्सल्यसिंधु
भुकेल्या वासरांची हंबरणारी गाय
कित्येकांना देऊन जीवन
हरपली अनाथांची माय
