विरह काव्य
विरह काव्य
खुणावते अजूनही त्याच वळणावरती,
सांज सावळी, गोजिरवाणी. ...
जिथे रंगल्या भेटीच्या मैफिली,
अलगद येते डोळा पाणी.....
क्षितिजावरच्या गुलाबी छटा,
कशा दाटल्या होत्या गाली माझ्या...
रातराणीही बहरली होती,
मधुकण विराजले होते अधरी तुझ्या....
किती रम्य होते ते विश्व दोघांचे,
ओठी तुझ्या माझेच गीत होते...
जगणे होते श्वासात एकमेकांच्या,
तुझ्या मुरलीतही राजसा मीच होते....
शमलीच नाही रे तृष्णा अधुरी ,
करून प्राशन मृगजळाचे पाणी...
निसरडी वाट, पडले घसरूनी ,
गात सुटले विरहाची गाणी.....
आठवांचा हा कल्लोळ,
किती निःशब्द, किती नीरव....
भावनांच्या या बाजारी तुझ्या,
झाले रे माझे जीवन बेचव....
विरहात ग्रीष्माच्या आजही आहे,
तुझ्याच रे आठवांचा बहर....
कसे आवरू पापणीआड मेघाला ,
अवकाळी येवून करतो रे कहर.....
