आतातरी खरं बोला
आतातरी खरं बोला
अटक मटक टोला, आतातरी खरं बोला||धृ||
ग्रह असून शनी
लागतो कसा मागे
अवदसेशी राहू केतू
कसे जोडतात धागे
खरचं माणसाने, कैद केला हरेक गोला||१||
नवग्रहाची शांती
कशी पृथ्वीवर होते
पाटावरचे काजू बदाम
कोण बरे घरी नेते
एकसुरात म्हणा, हर हर महादेव भोला||२||
घरोघरी रोज येथे
पुजली जाते गाय
मग वृद्धाश्रमात
का ठेवली जाते माय
सांगा सज्जनांनो, कधी उतरवाल खोटा चोला||३||
सतत पडद्यामागे
कशा लपवतात मुली
त्यांच्यावाचून तुमच्या
का जळत नाही चुली
घेऊ द्या उंच भरारी, बंद कवाडे खोला||४||
श्रद्धा आणि आस्थेचे
खेळ खेळतात कोण
सांग रे देवबाप्पा तू
त्यांना करतात कोण फोन
जाणुन घ्यावे सत्य, खऱ्या अध्यात्मात डोला||५||
