औंदाच्या साली(प्रकार:-लावणी)
औंदाच्या साली(प्रकार:-लावणी)
औंदाच्या या साली, तुमच्या उसाला आला भाव
कांडं पेरं भरली पाटील, राखण करा की राव॥धृ॥
जागे झाले रान, वाहे प्रितीचे वारे
पानोपानी बसून पाखरे, पाहती टकमक सारे
करून चित्तचोर इशारे, घेती ह्रदयाचा ठाव||१||
कांडं पेरं भरली पाटील, राखण करा की राव॥धृ॥
नाही चैन मनाला, चित्त झाले छचोर
कसे सांभाळू रान सारे, चोरेल कुणी चोर
इथे टपलेत सारे, सांगू कुणाचे नाव||२||
कांडं पेरं भरली पाटील, राखण करा की राव॥धृ॥
रस भरलं ज्वानीचं, आला हिरवा बहार
पिऊन घोट रसाचा, करावा गोडव्यात विहार
गरम झाली भट्टी, उगाच साधेल कुणी डाव||३||
कांडं पेरं भरली पाटील, राखण करा की राव॥धृ॥