माझी शब्दरचना
माझी शब्दरचना
नको असू दे गझल जरा
अन् नको असू दे कविता
माझी शब्दरचना असू दे
खळखळ वाहणारी सरिता
रोज खेळेल अस्मानी तारे
मुठीत जखडून ठेवील वारे
हुंदडत जाईल जग सारे
माझी प्राणप्रिय दुहिता
कधी बनेल धग विस्तवाची
कधी बरसेल सर पावसाची
कधी होईल झुळूक वाऱ्याची
वाहत नेईल नवा खलिता
कधी उडवेल हास्याचे फवारे
कधी उलगडेल दु:ख सारे
गुंफण करुन कैक भावनांची
लिहीन रोज नवी संहिता
