जमतं का बघ
जमतं का बघ
तत्व सारे गंगेत बुडवून
सत्व सारे पंढरीत सोडून
फक्त घुबडासारखं वागणं, जमतं का बघ....
नितीमत्तेचा करुन दिखावा
लबाडकीचा धंदा करावा
असं कोल्ह्यासारखं वावरणं, जमतं का बघ....
खुर्चीपुढे डोलवावी मान
खोटी खोटी मिरवावी शान
नंदिबैलासारखं डोलणं, जमतं का बघ....
तोंडावर अमाप स्तुती
मागे चुगल्याच नुस्ती
बरं सरड्यासारखं बदलणं, जमतं का बघ....
खाण्यापुरते असती सोबती
हात धुवून विसरती नाती
जरा लांडग्यासारखं उलटणं, जमतं का बघ....
चेहऱ्यावरचे उतरवून बुरखे
वाहत राहावे झऱ्यासारखे
थोडं माणूस म्हणून जगणं, जमतं का बघ....
