खरा चेहरा
खरा चेहरा
पाहत असतो माझा चेहरा
जेव्हा मी आरशात
तेव्हा मी मलाच शोधत असतो
मीच माझ्या चेहऱ्यावर
लोकांना फसविण्यासाठी
लावलेले मुखवटे
आता मलाच फसवायला लागले
लोकांसमोर एक माणूस म्हणून ओळखला जाणारा मी
स्वार्थासाठी बदललेला
माझा चेहरा बघून
आश्चर्य चकित
होत असतो
कधी कधी पाहत असतो मी
माझ्यात दडलेल्या
एक एक जनावारांना...
स्वार्थासाठी रंग बदलताना
सरड्यात पाहतो मला मी
आचरणाशिवाय बोलताना
पोपटात पाहतो मला मी
वासनांच्या मागे
रात्रंदिवस पळताना
सशात
तर कधी मी
मला घोड्यात पाहत असतो
कोणाची खोड काढताना मी
माकडाच्या रूपात पाहतो मला
कटूवचनाने आक्रमण करताना
फन काढून फुस फुसणाऱ्या
नाग आठवतो मला
स्वार्थासाठी लोकांना लुभावताना
रंगबेरंगी पिसारा फुलवून
लांडोऱ्याला लुभावण्यासाठी
नाचणारा मोर आठवतो मला
बुद्धीचा कुप्रयोग करताना
माझा चेहरा लांडग्यालाही लाजवतो
या सर्व चेहऱ्यात माझा खरा चेहरा शोधत असतो मी...
