काय तुझे उपकार
काय तुझे उपकार
काय तुझे उपकार पांडुरंगा ।
सांगो मी या जगामाजी आता ॥१॥
जतन हे माझे करोनि संचित ।
दिले अवचित आणूनिया ॥२॥
घडलिया दोषांचे न घाली भरी ।
आली यास थोरी कृपा देवा ॥३॥
नव्हते ठाउके आइकिले नाही ।
न मागता पाही दान दिले ॥४॥
तुका म्हणे याच्या उपकारासाठी ।
नाही माझे गाठी काही एक ॥५॥
