काळी आई
काळी आई
काव्यप्रकार - अष्टाक्षरी
धनी गेलं कर्जापायी
घोर जीवाला लागला
फाळ धरेला, मनाला
दुःख सांगावे कुणाला? (1)
मन झाले गा, चिंतीत
सारं शिवार तापलं
लई भेगाळली भुई
देवा कवा गंधाळंल? (2)
डोई बांधूनिया दस्ती
उभी खंबीर कामाला
राजा, सर्जाची गं साथ
लाभे दैवयोगे मला (3)
माय धरित्री मोलाची
काळी आई समद्यांची
अन्नदात्री कुटुंबाची
पीकं येत्याल मोत्याची (4)
किर्पा वरुणाची व्हावी
येवो धारा बरसूनी
महामूर पीकपाणी
आता होवो आबादानी (5)