STORYMIRROR

Shrikant Kumbhar

Inspirational

3  

Shrikant Kumbhar

Inspirational

जुनी सवय

जुनी सवय

1 min
286

उरले सुरले जपून वापरायची

सवय किती छान होती,

आयुष्य साधंच होतं तरी 

मजा काही औरच होती!


तोडकी मोडकी कंपास

पुन्हा जोडून वापरत होतो,

झिजली जरी पेन्सील तरी

टोपण लावून लिहीत होतो!


तुटलेला पेन पुन्हा पुन्हा 

स्प्रिंग बदलून वापरत होतो,

एकच पेन खूप जपून

रिफील करून वापरत होतो!


जुनीच पुस्तके वर्तमानपत्राचे

कव्हर घालून वापरत होतो,

तुझी पुस्तकं दे बरं मला

आधीच सांगून ठेवत होतो!


जुन्या वह्यांची कोरी पानं

दाभण वापरुन शिवत होतो,

जुन्यातूनच नाविन्याचा

आनंद आम्ही घेत होतो!


सायकलच्या जुन्या टायरचे 

गाडे आम्ही चालवत होतो, 

तोल कसा सांभाळावा ते 

बेमालूमपणे शिकत होतो!


फुटलेल्या फटाक्यांची

दारू गोळा करत होतो,

उरलेल्या चिंध्याचा मस्त

गरगरीत चेंडू करत होतो!


तुटलेल्या स्लीपरला पीन 

लावून वापरत होतो,

ध्येयाकडे न थांबता 

तरीही पाऊले टाकत होतो!


फुटलेल्या बांगड्यांनाही 

वाया घालवत नव्हतो,

दगडांचा बच्चू तर फरशीची 

लगोरी आम्ही करत होतो!


फाटलेल्या गोधडीला ठिगळं 

लावून सजवत होतो,

उसवलेल्या कपड्यांना

धाग्या दोऱ्याने सांधत होतो!


गंध जरी जुना असला 

तरी छंद मात्र नवा होता,

काटकसर अन बचतीचा 

संस्कारच चिरकाल होता!


वापरा आणि फेकून द्या याचा

हल्ली जमाना आलाय,

किंमत नाही वस्तूंची म्हणून

नव्याचा कचरा झालाय!


सुई धागा हरवला नाही,

पण तो हल्ली कोण घेत नाही.

फाटलेली नाती आणि वस्तू

खरं तर कोणीच शिवत नाही!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational