जर ती नसती तर
जर ती नसती तर
माणसांना कधी कळेना
स्त्रीयांचे महत्व किंमत,
ती नसती तर, जीवन व्यर्थ
तीच असे माणसाची हिंमत..!
साक्षीला इतिहास आहे
रणांगणी लढे झाशी राणी,
ती नसती तर, शत्रूंना त्या
कुणी पाजले असते पाणी..!
स्त्री शिक्षणासाठी सावित्रीने
सहला किती छळ अपमान,
ती नसती तर, शिकलो नसतो
असो सर्वांनाच अभिमान..!
कसे फेडणार सांगा मजला
जन्मदात्या आईचे उपकार,
ती नसती तर, आम्ही नसतो
करू नका रे तिज निराधार..!
स्वतःच्या बहिणीची माया
समजली नाही तिच्या भावा,
ती नसती तर, भाऊबीजेला
सांगा कुणा ओवाळण्या दावा..!
का चालवली गर्भ चाचणी
या स्त्री जन्मालाही स्वीकारा,
ती नसती तर, मायबापांनो
डोळी नसत्या प्रेमाच्या धारा..!
