जपणूक
जपणूक
पाऊल अलगद टाकं
पाय वळण्याआधी रं..
तोल सावरं माणसा
जरा ढळण्याआधी रं...
अन्न जप घाल मुखी
ते विटण्याआधी रं...
नाती जप रं माणसा
ती तुटण्याआधी रं...
शब्द वापर तोलून मोलून
बोलण्याआधी रं...
अर्थ जपावा मनात
शब्द मांडण्याआधी रं...
रंग जप आयुष्याचे
उधळण्याआधी रं..
मन जप आपुल्यांचे
ते मोडण्याआधी रं...
वारं जप रं माणसा
होण्या जखमेआधी रं..
अश्रू जप बहुमोल
कुणा हसण्याआधी रं...
श्वास जपावा जपावा
धाव पळण्याआधी रं..
वस्र जपावे जिवापाडं
ते मळण्याआधी रं...
द्रव्य जपावे ते सारे
कुठं सांडण्याआधी रं..
हात जपावे आपुले
काही मागण्याआधी रं....
भेद जपावा जपावा
तो खुलण्याआधी रं...
राग जपावा ह्या देही
होण्या भांडणाआधी रं...
जीव जपावा मोलाचा
सरण जळण्याआधी रं..
वेळ जपावी जीवनभर
मरणाआधी रं....
