ज्ञानरूपी वसा
ज्ञानरूपी वसा
गुरू देती आम्हा |ज्ञान रूपी वसा |
दिसे कवडसा |प्रकाशाचा ||१||
ज्ञानरूपी वसा | ठेवा अनमोल|
ज्ञान हे सखोल | गुरू देती ||२||
ज्ञानरूपी दीप| भेदतो तिमिर |
दूर अंध:कार | मनातला ||३||
ज्ञानरूपी ज्योत|कधी ना विझावी|
तेवत ठेवावी |अखंडित||४||
ज्ञानरूपी दिवा| प्रकाशाची वाट |
होतसे पहाट | जीवनात ||५||
ज्ञानाचा प्रवाह | नसे त्यात खंड |
वाहतो अखंड | झुळुझुळु ||६||
शिक्षणाने दिली |भक्कम शिदोरी|
घेतली भरारी | नभांगणी ||७||
शिक्षणाने वाढे | बुध्दीची श्रीमंती |
आणतसे क्रांती| स्वतःमध्ये ||८||
ज्ञानरूपी वसा | घेऊया हातात |
देऊया जनात |सततची ||९||
गुरूचे महत्व| असते अनन्य|
करिते संपन्न | *दक्षा म्हणे*||१०||
