जाग तू रणचंडिके
जाग तू रणचंडिके
निर्भया, प्रियांका, अंकिताचा
मृत्यु होता अति दाहक
स्त्री शक्तीचा झाला जागर
दुर्गे तुच हो क्रुरतेची मारक
पुरुषी हक्काचा माज
दबवी तुझा आवाज
ऐक मनाची गाज
लढण्यास हो सज्ज
द्रौपदीचे होते वस्त्रहरण
कृष्णसखा धावे, करण्या रक्षण
ध्यानात ठेव तू ललने
तुझे तुलाच करणे रक्षण
स्वत:च्या संरक्षणार्थ
तू हो झाशीची राणी
नराधमांना पाज पाणी
बनूनी रणरागिणी
कायदे कानून विफल
क्रोध, क्षोभाची उठली लहर
गुन्हेगारास शिक्षा कर जबर
जरब बसवेल, शिक्षा कठोर
नजर वाकडी बघणाऱ्यास
तत्पर उत्तर दे ठासूनी
जाळ नजर सत्वर त्यांची
दुर्गे, हाती शस्त्र घेऊनी
खळ मानसिकता बदल जरुर
सक्षम तुज करतील अायुधे
करण्या दुष्टांवर जोरात प्रहार
जाग तू अाता रणदुर्गे
जाग तू आता रणचंडिके
स्त्री अत्याचाऱ्यांचं कर दमन
विकृत वृत्तीचे कर तू दहन
स्त्रीशक्तीस माझे त्रिवार वंदन
